कळमेश्वरच्या कोविड सेंटरमध्ये लागली पाणीगळती, महापालिकेचा पैसा गेला वाया

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - नागपूर शहरात कोरोना संसर्गामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेत महापालिकाकडून ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला. कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेवर हे सेंटर तयार करण्यात आले होते. एकूण ५ हजारपैकी ५00 बेड याठिकाणी सज्ज ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळय़ात येथे रुग्ण ठेवणे शक्य नाही. पावसामुळे या सेंटरला गळती लागली असून, बेड जंगलेल्या अवस्थेत तर गाद्या भिजलेल्या अवस्थेत असल्यामुळे सेंटरसाठी करण्यात आलेल्या ३५ लाखांचा खर्चावर पाणी फिरल्याचे एकूणच चित्र आहे. 

स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मंगळवारी या कोविड सेंटरला आकस्मिक भेट दिली. यावेळी या सेंटरमधील वास्तविक स्थिती पुढे आली. सेंटरमध्ये जवळपास २00 बेडवर गाद्या गुंडाळून ठेवल्याच्या स्थितीत होत्या. अनेक ठिकाणाहून पाणी गळत असल्यामुळे येथील बेड भिजले होते. मुसळधार पाऊस झाल्यास येथील शौचालयात देखील जाणे शक्य नाही. मनपा प्रशासनाकडून या सेंटरसाठी मोठा खर्च करण्यात आला. 

सेंटरमध्ये चादर व अन्य साहित्यावरही खर्च झाला आहे. दरम्यान, शहरात कोविडचे रुग्ण वाढत असताना या केंद्रात एकही रुग्ण दाखल करण्यात आलेला नाही. कारण येथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचे स्थायी सभापतींनी सांगितले. दरम्यान, शहरात कोविडचे सेंटर तयार करण्याची जागा आहे. मात्र, आयुक्तांनी शहरापासून दूरवर (२५ किलोमीटर) अंतरावर राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत हे सेंटर उभारले. हे करताना आयुक्तांनी पदाधिकार्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.