चंद्रपुरात प्रकल्पग्रस्तांनी नोकरीसाठी विद्युत केंद्राच्या चिमणीवर चालून केले आंदोलन

August 05,2020

चंद्रपूर : ५ ऑगस्ट - नोकरीत सामावून घ्या या मागणीसाठी मागील १० ते १२ वर्षांपासून आंदोलन करीत असलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी ६ जणांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक ७ च्या चिमणीवर चढून आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यामुळे वीज केंद्राच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. वीज केंद्राची उभारणी करताना १९७० मध्ये या भागातील हजारो लोकांच्या शेतजमीन घेण्यात आल्या होत्या. त्यातील काहींना प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत सामावून घेतले गेले. मात्र, आजही शेकडो प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना कंत्राटदाराकडे ८ ते १० हजार रुपये पगारावर नोकरी करावी लागत आहे. वीज केंद्रात कायम नोकरीत घ्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत आहे.

दरम्यान, आज सकाळी तीन मुले आणि तीन मुलींनी वीज केंद्राच्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या चिमनीवर बसून आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच वीज केंद्राचे सर्व अधिकारी व पोलीस घटनास्थळी पोहचले असून आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.