अनियमित वीजपुरवठ्यासाठी गडचिरोलीत केले चक्काजाम आंदोलन

August 05,2020

गडचिरोली : ५ ऑगस्ट -  कोरची तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत वारंवार निवेदने देऊनही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त् झालेल्या नागरिकांनी आज  कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

कोरची तालुक्याला पूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड येथून वीजपुरवठा केला जात होता. परंतु गोंदिया जिल्हा महावितरण कार्यालयाने कोरची तालुका गडचिरोली जिल्ह्याचा भाग असल्याचे सांगून कोरची तालुक्याला होणारा वीजपुरवठा खंडित केला. तेव्हापासून या तालुक्याला कुरखेडा येथून वीजपुरवठा केला जात आहे. कोरची तालुक्याला ३३ केव्ही विजेची आवश्यकता आहे. मात्र, पुरवठा केवळ १८ केव्हीचा होत असल्याने चोवीस तासांपैकी १८ तासभार नियमन, तर केवळ ६ तास वीजपुरवठा सुरु आहे.

या विरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कोरची तालुक्यातील विजेची समस्या सोडवावी, तालुक्यात बीएसएनएल नेटवर्कसाठी टॉवर उभे करावे, तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, इत्यादी मागण्यांचा आंदोलनकर्त्यांनी पुनरुच्चार केला.

आ.कृष्णा गजबे हे स्वत: या आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वपक्षीय आंदोलन समितीचे अध्यक्ष शामलाल मडावी, सचिव नंदकिशोर वैरागडे, उपाध्यक्ष नसरुभाऊ भामानी, सहसचिव आनंद चौबे, कोषयाध्यक्ष मनोज अग्रवाल, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम,सरपंच उपसभापती सौ.जमकातन, पंचायत समिती सदस्य कचरीबाई काटेंगे, कोरची नगरपंचायत अध्यक्ष ज्योती नैताम, उपाध्यक्ष कमलनारायन खंडेलवाल, पंचायत समिती सदस्य सदाराम नुरुटी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमंत मानकर, माजी सरपंच सियाराम हलामी, डॉ शैलेन्द्र बीसेन, धनिराम हिडामी, परमेश लोहंबरे, भूपेन्द्र भंडारी, गिरजा कोरेटी, महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडुराम सलामे, अशोक गावतुरे, राजेश नैताम, रामकुमार नायक ,देवराव गजभिये,सदरुददीन भामानी आदी सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलन सुरु असताना महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.बोरसे व कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी भेट दिली. त्यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा केली. परंतु तोडगा निघाला नाही. बीएसएनएलचे अभियंतेही आंदोलनस्थळी आले होते. त्यांनाही आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरले. संध्याकाळपर्यंत हे आंदोलन सुरुच होते.