महिलेचा अंघोळ करताना काढला व्हिडीओ, दिली व्हायरल करण्याची धमकी

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट -  महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन नोकराने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोकराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

नागपूरमधील अजनी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. चेतन खडतकर (रा. नंदनवन) असे नोकराचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजनी भागात पीडित ४० वर्षीय महिला राहते. तिचे पती सीए असून चेतन हा त्यांच्याकडे काम करतो. घरातच कार्यालय असल्याने चेतन याचा घरात सतत वावर असायचा. याच दरम्यान तो पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. नोकर असल्याने महिला त्याकडे दुर्लक्ष करायची. ६ जुलैला महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. याचदरम्यान चेतन याने महिलेचा मोबाइलद्वारे व्हिडिओ काढला. त्यानंतर त्याने महिलेच्या घरातीलच संगणकावर धमकीचे पत्रही तयार केले. हे पत्र पीडित महिलेला पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे महिला प्रचंड घाबरली. सुरुवातीला तिने चेतन याच्या काही मागण्या मान्य केल्या. तो महिलेशी अश्लिल चाळे करायला लागला. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला. त्यावर आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अखेर तिने याबाबत पतीला सांगितले. पतीने महिलेसह अजनी पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चेतन याचा शोध घेण्यात येत आहे.