राममंदिर भूमिपूजनाचा लता मंगेशकरांना आनंद, दिले अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरेंना श्रेय

August 05,2020

मुंबई : ५ ऑगस्ट - अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना देशभरात आनंद व उत्साहाचं वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी एक सविस्तर ट्वीट करून आजच्या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

कित्येक राज्यकर्त्यांचे, कित्येक पिढ्यांचे आणि अखिल विश्वातील रामभक्तांचे स्वप्न आज साकार होत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची पुन्हा उभारणी होत आहे. कोनशिला बसवली जातेय. याचं सर्वाधिक श्रेय लालकृष्ण आडवाणी यांना जाते. रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर रथयात्रा काढून आडवाणी यांनी संपूर्ण देशात जनजागृती केली होती. त्याबरोबर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाही याचं श्रेय जातं,' असं लतादीदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

'करोनाच्या संकटामुळं आजही भलेही लाखो रामभक्त अयोध्येत जाऊ शकले नाहीत. पण प्रत्येकाचं मन आणि ध्यान आज फक्त श्रीरामाच्या चरणी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होतोय हे देखील आनंदाची गोष्ट आहे. माझं संपूर्ण कुटुंब आणि अवघं जगच आज आनंदलं आहे. प्रत्येक श्वास 'जय श्रीराम' म्हणतोय असं वाटतंय, अशी भावनाही लतादीदींनी व्यक्त केली आहे.