वर्धेनजीक राष्ट्रीय महामार्गावर साचले पाणी, कारदेखील पाण्यात तरंगली

August 05,2020

वर्धा : ५ ऑगस्ट - नागपूर ते तुळजापूर हा सहापदरी महामार्ग वर्धाला वळसा घालून जातो. शहराच्या वळण मार्गावरील आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठासमोर मोठा पूल बांधण्यात आला आहे. याच पुलावर दोन दिवसातील संततधार पावसाने जवळपास दोन फूट पाणी साचले आहे.

नुकताच बांधून पूर्ण झालेल्या या मोठ्या पूलावरील पाणी साचण्याचा प्रकार चांगलाच धक्कादायी ठरत आहे. याच मार्गावरून सावंगी येथील मेघे अभिमत वैद्यकीय विद्यापिठाचे डॉक्टर व अन्य मंडळी प्रवास करत असतात. या पैकीच एका डॉक्टरची कार पाण्यात अडकली होती. एवढच नाहीतर साचलेल्या पाण्यात ही कार काही वेळ तरंगत देखील होती, असे डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर  सांगितले. हा प्रकार अत्यंत भितीदायक असून यामूळे पावसाळ्यात कधीही अपघात घडू शकतो, असे या डॉक्टरानी सांगितले आहे.

याबाबत खासदार रामदास तडस यांना सांगितले असता, आपण माहिती घेत असल्याचे त्यांनी उत्तर त्यांनी दिले. ही गंभीर बाब आहे, या संदर्भात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी मी नुकताच बोललो आहे, उद्या  त्यांची चमू या ठिकाणी येऊन पाहणी करेल. शिवाय, तात्काळ लगेच दुरस्तीही केल्या जाईल, अशी खात्री खासदार तडस यांनी दिली.

यापूर्वी देवळीच्या मार्गावरही त्रूटी दिसून आल्यावर लगेच दुरूस्ती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मेंढे यांनी ही त्रूटी मान्य केली. पूलालगतचा रस्ता उंच झाल्याने पाणी साचल्याचे लक्षात आले आहे. दोनच दिवसात ही समस्या दूर होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.