बाबरी मशिदीचा घुमट काढण्यात शिवसेनेचा मोठा वाटा -संजय राऊत

August 05,2020

मुंबई : ५ऑगस्ट -  अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी घुमट काढण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा असल्याचं सांगताना कुणीही याचं श्रेय घेऊ नये असा दावा त्यांनी केला आहे.  तसेच या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहे. शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. आजचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचं मोठं योगदान आहे.”

 “या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे कार्यक्रम करणार आहे. आजच्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी वयोमानामुळे उपस्थित राहू शकले नाहीत,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

दरम्यान, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी 1 कोटी रुपये पाठवल्याची माहिती दिली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली होती. या व्हिडीओत अनिल देसाई म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या वेळी राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी देऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेतर्फे राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी स्टेट बँकेत जमा केला आहे. त्याबाबत अनिल मिश्रा आणि खजिनदार चंपकलाल यांनीही ते पैसे मिळाल्याची पोचपावती दिली.”