राममंदिरासाठी केला अनोखा संकल्प

August 05,2020

अमरावती : ५ ऑगस्ट - गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले.  गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राम मंदिर निर्मितीच्या लढ्यात अनेकांनी योगदान दिले. राम मंदिर व्हावे यासाठी अनेक राम भक्तांनी उपवास, ध्यान, चप्पल न घालणे, असे अनेक संकल्प केले. चांदुर बाजार तालुक्यातील करजगावातील विजय वडनेरकर या रामभक्ताने केलेला अनोखा संकल्प सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राम जन्मभूमीच्या ३० ऑक्टोबर १९९०ला झालेल्या पाहिल्या कारसेवेपासून ते मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा होईपर्यंत डोक्यावरील केसांची शिखा(शेंडी) न कापण्याचा संकल्प विजय वडनेरकर यांनी केला होता. मागील ३० वर्षांपासून त्यांनी शिखा कपाली नसून ती आता चार फूट लांबीची झाली आहे. आता राम मंदिर भूमिपूजन झाल्याने दीड वर्षांनंतर अयोध्येला जाऊनच तीस वर्ष वाढवलेली शिखा ते कापणार आहेत.

राममंदिर निर्माण व्हावे, ही गेल्या अनेक वर्षांपासून विजय वडनेरकर यांची इच्छा आहे. त्यासाठी ते आत्तापर्यंत तीन कारसेवेत सहभागीसुद्धा झाले आहेत. राम मंदिरासाठी जेव्हा-जेव्हा आंदोलने झाली तेव्हा-तेव्हा ते त्यात सहभागी झाले. ३० ऑक्टोबर १९९०ला झालेल्या कारसेवेत ते अयोध्येला जाऊन आले आहे. तेव्हा अनेक रामभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून जोपर्यंत राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत डोक्यावर शिखा वाढवण्याचा संकल्प त्यांनी केला. अयोध्येत राम मंदिर निर्माण होणार असल्याने माझ्या संकल्पला यश आले असून मी खूप समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आता दीड वर्षांनंतर अयोध्या येथे होणाऱ्या महायज्ञामध्ये जाऊन तेथेच ही केसांची शिखा कापणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विजय वडनेरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अचलपूरचे महामंत्री आहेत. लहानपणापासूनच रामभक्त असल्याने त्यांना रामाविषयी आस्था आहे. राम प्रचारात ते अग्रणी असतात. त्यांनी केलेला संकल्प आणि राममंदिर उभारणी लढ्यात दिलेल्या सहभागाबद्दल त्यांचा चांदुर बाजार येथे गौरव करण्यात आला.