प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे राष्ट्रीय एकजुटीचे प्रतीक - नरेंद्र मोदी

August 05,2020

लखनऊ : ५ ऑगस्ट - अयोध्या : भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय ठरला आहे. आज देशातील नागरिकांच्या सहकार्याने  राममंदिर उभारणीचे काम सुरु होत आहे. प्रभू श्रीरामाचे  मंदिर म्हणजे राष्ट्रीय  एकजुटीचे  प्रतीक आहे. श्रीराम गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे स्तंभ बनले आहेत. श्रीरामाचं नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या त्या एक ऊर्जा निर्माण करत आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या येथे बोलताना केले. 

अयोध्या येथे प्रस्तावित राममंदिराच्या भूमिपूजन आणि शिलान्यास समारोहानंतर देशातील जनतेला पंतप्रधान संबोधित करत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मंदिर निर्माण न्यासाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. 

 कोरोनामुळं हा कार्यक्रम काही मर्यादांचं पालन करुन होत आहे. याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले, की प्रभू श्रीराम यांच्या कार्यक्रमासाठी मर्यादांचं पालन  व्हायला  पाहिजे तसेच देशातील नागरिकांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला होता. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. 

 संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली, आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले.

ते म्हणाले की,  श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया  राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले. 

राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो, असे सांगून या  ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान मोदींनी व्यक्त केला.  शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे.  आज श्रीरामाचा जयघोष केवळ सिया-रामाच्या भूमीतच नाही तर संपूर्ण जगभरात घुमत आहे. सर्व देशावासियांना, जगभरातील राम भक्तांना आजच्या आनंदाच्या क्षणी कोटी कोटी शुभेच्छा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळते. अनेक देशातील लोक प्रभू श्रीरामाला मानतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असेल्या इंडोनेशियात रामायण पूज्यनीय आहे. कंबोडिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि चीनमध्ये राम कथांची माहिती मिळेल. नेपाळ आणि श्रीलंकेचाही संबंध जोडलेला आहे. अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल. प्रभू श्रीराम हे सर्वांमध्ये आहेत. ते सर्वांचे आहेत. राम मंदिर अनंक काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल. प्रभू श्रीरामाचा संदेश संपूर्ण जागापर्यंत कसा निरंतर पोहोचेल हे आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन सुरु, "सियावर रामचंद्र की..." जयघोष करत भाषणाला सुरुवात केली. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर आधारित नव्या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. तब्बल पाच लाख टपाल तिकिट छापण्यात येणार आहेत. आज संपूर्ण भारत राममय आणि मन दीपमय झाला आहे, एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली.