बुलढाण्यात मका खरेदी बंद, शेतकरी अडचणीत

August 02,2020

बुलढाणा : २ ऑगस्ट -   नाफेड अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या मका खरेदी केंद्रावर साईट बंद झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे मका खरेदीसाठी ३१ जुलै शेवटची तारीख दिली असताना देखील ३० जुलैच्या दुपारीच नाफेड खरेदी विक्री केंद्राची ऑनलाईन साईट बंद पडली तर काल  शिवसेनेने खरेदी विक्री केंद्रावर धडक दिली होती. 

अधिकाऱ्यांना धारेवर धरून शेतकऱ्यांचा संपूर्ण मका खरेदी केल्या जाईल, असे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. मात्र दुपारी साईटच बंद झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन करीत मका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेऊन टाकण्याचा इशारा यावेळी दिला. लॉक डाउनच्या काळात अनेक शासकीय निर्बंध असताना शेतकरी अवकाळी पाऊस, दुबार पेरणी, बोगस बियाणे, यासारख्या अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत शेतात राबले. कष्टाने पीक घेतले. 

शासन मका केव्हा खरेदी करणार? यासाठी ताटकळत राहिला. अखेर मका खरेदी विक्री केंद्र कार्यान्वित झाले. मुख्यमंत्र्यांनी ८५ हजार क्विंटल मका ३१ जुलैच्या आत खरेदी करण्याची परवानगी दिली होती. तर जिल्हा प्रशासनाने दररोज ३०० शेतकऱ्यांचा माळ खरेदी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या. दरम्यान नोंदणी करण्यात आल्यावर आपल्याला खरेदी विक्री केंद्राकडून  सूचना येईल आणि आपण आपला मका विकून आपल्या गरज भागवू , कर्ज फेडू  या आशेवर बसलेल्या शेतकऱ्याला मॅसेज आला. त्यांनी मक्याचा माल तालुका खरेदी विक्री केंद्रावर भाड्याच्या गाडीत आणला. आणि नंबर लागण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहिले. आजही १०० ते १५० गाड्या उभ्या आहेत. त्यांचा नंबर येईपर्यंत नाफेड खरेदी केंद्राची साईट बंद झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.