रिसोडमध्ये एका रात्रीत तीन चोऱ्या

August 02,2020

वाशीम : २ ऑगस्ट - रिसोड शहर व तालुक्यात चोरांनी धुमाकुळ घातला असून, चोरीचे सत्र वाढत चालले आहे. रिसोड शहरात एक ऑगस्टच्या रात्री तीन ठिकाणी चोरांनी हात साफ करून अडीच लाखाचा ऐवज लंपास केला.

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील भाजीमंडी समोरील एका कॉम्प्लेक्समधील शिवशंकर कायंदे यांच्या वैश्णवी इलेक्ट्रॉनिक्स रात्री दरम्यान दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून चोरांनी महागड्या कंपनीचे 12 एलईडी, मिक्सर व इतर सामान मिळुन तब्बल दोन लाखाचा ऐवज लंपास केला. तर दुसर्या घटनेत रिसोड शहरातील कंटेनमेंट झोन असलेला पठानपुरा येथे दोन ठिकाणी घरफोडी केली. शेख ज़मिर शेख लुकमान हे हातगाड्यावर रेडिमेड कपड्याचा व्यापार करतात व पठाणपुर्यात भाड्याने राहतात. एक ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता ते आपल्या नातेवाइकांकडे जेवायला गेले असता 10.30 वाजता परत आले. मात्र, यादरम्यान चोरांनी त्यांच्या घरची खिडकी तोडून आत प्रवेश करून पेटीतील नगदी 31 हजार 400 रुपये चोरून नेले. तिसर्या घटनेत पठानपुरा येथील कॉरंन्टाईन असलेल्या एका व्यक्तीच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट तोडून त्यातील 20 हजार नगदी लंपास केले. या तिन्ही घटनेत चोरांनी जवळपास अडीच लाखाचा ऐवज लंपास केला.