चांदुररेल्वेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा परिसर आता होणार हिरवागार

August 02,2020

अमरावती: २ऑगस्ट  - वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी झाल्याने वातावरणात बदलासह प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. हा विचार करून यावर्षी चांदूर रेल्वेच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्र शाळा परिसरात ६ हजार ५०० वृक्षांची लागवड केली जाणार असून यामुळे परिसर हिरवागार होणार आहे. 

सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि चांदूर रेल्वेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्र माध्यमिक शाळा परिसरात सन २०२०-२१ या वर्षात एकूण ६ हजार ५०० झाडे लावली जाणार आहेत. वृक्ष लागवडीसह ३ वर्षांची संगोपनाची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार आहे. 

या वृक्षारोपणाचे उद्घाटन आयटीआयचे प्राचार्य सुधीर पाटबागे, तंत्र शाळेचे मुख्याध्यापक सुनिल वानखडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले असून वृक्षारोपणाला सुरूवात झाली. या ठिकाणी वड, कडूनिंब, आवळा, आंबा, पिंपळ यासारखी विविध झाडे लावण्यात येणार असल्याने संपूर्ण आयटीआय परिसरात हिरवी चादर पसरणार आहे.