चोराच्या केसांची स्टाईल सीसीटीव्हीत कैद झाली आणि त्यामुळेच चोरी पकडली गेली

August 02,2020

वर्धा : २ ऑगस्ट -  वर्ध्यात एका अट्टल चोरट्याचा त्याच्या केसांनीच घात केल्याचं समोर आलं आहे .गौरक्षण वॉर्ड येथील दीपक मगर यांच्या घरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अर्पण उर्फ लखन राहूल पाटील (33, रा. गोजी) असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. या स्टायलीश चोराने चोरी केल्यानंतर चोरीची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा केली. मात्र, चोरी करताना तो सीसीटीव्हीत कैद झाला. याच सीसीटीव्ही चित्रिकरणावरुन त्याच्या केसांच्या स्टाईल उघड झाली. या सुगाव्यावरच रामनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

वर्ध्यात अज्ञात चोरट्याने दीपक मगर यांच्या बंद घरात प्रवेश करुन घरातून 20 हजाराची रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरली. दीपक मगर यांनी 15 जुलैला याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरुवात केली. चोरट्याने चोरी करताना मगर यांच्या घरातून एटीएम कार्डही चोरुन नेले होते. याच एटीएम कार्डचा वापर करुन या चोरट्याने मगर यांच्या बँक खात्यातून रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका एटीएममधून 13 हजारांची रोख रक्कम काढली. हेच कृत्य करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

तांत्रिकदृष्ट्या माहिती गोळा केल्यावर चोरी गेलेल्या एटीएम कार्डचा पैसे काढण्यासाठी वापर झाल्याचे पुढे आल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचे चित्रिकरण तपासले. पोलिसांना चोरट्याचा सुगावा लागला. त्यानंतर रामनगर पोलिसांनी मोठी गुप्तता बाळगत अर्पण उर्फ लखन राहूल पाटील याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी दिली.

चोरटा अर्पण पाटील याने चोरीची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली होती. ही रक्कम रामनगर पोलिसांनी जप्त केली आहे. या चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.