दोन चिमुकल्यांना वाहनाने चिरडले

August 01,2020

चंद्रपूर : १ ऑगस्ट - भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने दोन चिमुरड्यांना चिरडले. यात एकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दूसरा गंभीर जखमी आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या नवेगाव वाघाडे येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सूमारास घडली. निथी पंढरी मेश्राम असे मृत मुलीचे नाव असून गंभीर जखमी असलेल्या आश्मित बंडू मेश्राम याचावर चंद्रपूरात उपचार सूरू आहे.

प्राप्त माहीतीनुसार आष्टी-गोंडपिपरी मार्गावर असलेल्या नवेगाव वाघाडे येथील निथी पंढरी मेश्राम, अश्मित बंडू मेश्राम हे दोघे घरा समोरील मोकळ्या जागेत बसले होते. याच दरम्यान आष्टीकडून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप ( MH 33 G0560 ) वाहनाने या दोघांना उडविले आणि अनियंत्रित झालेला पिकअप पंढरी मेश्राम यांच्या अंगणात पलटी झाला.

या भीषण अपघातात निथी मेश्राम ही घटनास्थळीच ठार झाली, तर अश्मित मेश्राम हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले असून प्रकृती नाजूक असल्याची माहीती आहे. 

हा अपघात मंद्यधूंद अवस्थेत असलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने घडला. अपघाताची माहीती मिळताच गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार संदिप धोबे करीत आहेत.या घटनेने नवेगाव वाघाडे गावावर शोककळा पसरली आहे.

खड्यात पडल्याने ती मुले बचावली....!

मृत निथी मेश्राम, जखमी अश्मित मेश्राम यांच्या सोबत काही मुलेही खेळत होती. पिकअपने निथी आणि अश्मित धडक दिली. त्यावेळी स्वत:चा प्राण वाचविण्यासाठी मैथीली रामटेके, अंथरा मेश्राम, सृजन मेश्राम धावले. धावतांना मैथीली नळाच्या खड्ड्यात पडली. याच खड्ड्यावरून पिकअप गेला. त्यामुळे खड्ड्यात पडल्यामुळे मैथीलीचा जीव वाचला. तर अंथरा आणि सृजनही बचावले.