अचलपुरात दोन शासकीय कार्यालये सील

August 01,2020

अमरावती : १ ऑगस्ट - अमरावती जिल्हाभरात अचलपूर व अंजनगाव सुर्जी शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. शुक्रवारी आलेल्या अहवालात अचलपूरच्या उपविभागीय विद्युत महावितरण कार्यालयातील एक शिकाऊ महिला कर्मचारी व वाहन चालक कोरोना संक्रमित आढळला, तसेच स्थानिक ब्राह्मणसभा कॉलनी निवासी असलेले नगर परिषद अभियंताही बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या अर्धशतकपार म्हणजेच 52 झाली आहे. दुसरीकडे अंजनगाव तालुक्यात दोन दिवसात बाधित रुग्णांची नव्याने नोंद नसल्याने अंजनगाववासीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. अंजनगाव तालुक्यासह शहरातील एकूण 41 बाधित झाले असून सक्रिय 8 रुग्ण आहेत व 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

 कोरोना काळात अचलपूर न. प. प्रशासन जीवाची बाजी लावत कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी नगर अभियंता बाघित आढळल्याने शहरवासी हळहळ व्यक्त करीत आहे. बाधित अभियंता नगर रचनाकार यासह एका खोलीत सहवासात राहत होते. काही दिवसापूर्वी ते आजारी असल्याने पं. दे. वै.महाविद्यालय अमरावती येथे दाखल करण्याकरिताही सोबत असल्याने तेथेच स्वॅब घेतला असता अहवाल सकारात्मक आला. नगर परिषद प्रशासनातील 10 कर्मचारी अति संपर्कात असल्याने अग्रसेन भवनमध्ये विलगीकरणात ठेवले आहे. जुळ्या शहरात आजपर्यंत गृह विलगीकरणात 2192 विदेशातून आलेले आहेत. सद्य:स्थितीत कल्याण मंडपम येथे 26 व अग्रसेन भवनात 9, असे एकूण 35 लोक विलगीकरण कक्षात राहात आहेत. एकूण कोरोना रुग्ण 52, सक्रिय 26, उपचार घेऊन बरे झालेले 25 तर मृत्यू झालेल्यांची संख्या 4 आहे. अतिसंपर्कातील 246 तर सामान्य संपर्कातील 815 व्यक्ती आहे. वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारीही बाधित होऊन, उपचार घेऊन ठणठणीत झाले आहेत. सध्या नगर परिषद कार्यालय प्रतिबंधित केले असून पुढील कारभार कोठून पाहणार, याची विचारणा शहरवासीय करताहेत. तूर्तास शहर कार्यालयातून काम सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे.

 अचलपूर उपविभागीय विद्युत महावितरण कार्यालय तात्पुरते बंद केले असल्याची माहिती आहे. या कार्यालयातील बाधित दोन कर्मचार्यांच्या अति संपर्कात दहा कर्मचारी आले असल्याचा अंदाज असल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. परतवाडा येथील सदर बाजार, सायमा कॉलनी, शिक्षक कॉलनीनंतर सिव्हील लाईन, गुरूनानक नगर, पंचायत समिती सोबतच वीज वितरण कंपनी, ब्राम्हण सभा परिसरात कोरोनाने पाय पसरवलेले दिसून येते. ब्राम्हणसभा निवासी असलेल्या अधिकार्याच्या स्वरुपात चक्क नगरपरिषदेतही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.

 याबाबत बोलताना नगर परिषेदेच कर निरीक्षक डॉ. रोहन राठोड म्हणाले की, न. प. चा अधिकारी बाधित आढळून आल्याने त्यांच्या अतिसंपर्कात असलेल्यांना तात्काळ अग्रसेन भवनात दाखल करण्यात आले आहे. सोबतच इतर सर्व कर्मचार्यांचे गृृह विलगीकरण करण्यात आले आहे. पुढील काही दिवस कामकाज अचलपूर शहर कार्यालय येथून चालेल व काही कर्मचारी घरून काम करतील.