दूध दरवाढीसाठी अकोल्यातही आंदोलन

August 01,2020

अकोला : १ ऑगस्ट - काही दिवसांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले होते. आता पुन्हा सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. भाजपने शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता डाबकी रोड, सरकारी बगीचा, खडकी येथे आंदोलन केले. अकोल्यात येणाऱ्या दुधाच्या गाड्या त्यांनी अडविल्या. दुधाला, भूकटीला भाव द्यावा आणि लॉकडाऊनच्या काळातील विद्युत बील माफ करण्यासाठी हे आंदोलन सहा विभागात करण्यात आले. 

दुधाला भाव मिळण्यासाठी भारतीय किसान संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर भाजपनेही आंदोलन करून शहरात येणाऱ्या दुधाच्या गाड्या अडविल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विजय अग्रवाल, नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, यांच्यासह महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

दुधाची गाडी अडवून त्यांनी नारेबाजीही केली. दुधाला दहा रुपये वाढीव दर द्यावे, दुधाच्या भूकटीला 50 रुपये वाढीव दर द्यावे. त्यासोबतच लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल आलेले बिल माफ करण्यात यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डाबकी रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचारी आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. याखेरीज कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.