भिकाऱ्यांनीच केला साथीदारांचा खून

August 01,2020

नागपूर : १ ऑगस्ट  - क्षुल्लक वादातून दोन भिकार्यांनी त्यांच्याच साथीदार भिकार्याचा डोक्यावर सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.३१) सकाळी दहा-साडेदहा वाजताच्या सुमारास धंतोली हद्दीतील शनी मंदिर आणि राधाकृष्ण मंदिराला लागून असलेल्या फुटपाथवर घडली. सोनू असे मृतकाचे नाव आहे. त्याची पूर्ण ओळख अजून पटली नाही.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी कोष्टीपुरा हिंगणा येथे राहणारा नंदकिशोर जीवन नंदनवार (४२) आणि सोनू ऊर्फ सोहेल खान बब्बू खान (२४) रा. मौलाना मशिदजवळ मोठा ताजबाग यांचे सोनू भिकारीशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद चिघळत गेल्याने दोघांनी संगनमत करून त्याला हाथबुक्कीने मारहाण केली. यावरच ते थांबले नाही तर त्यांनी रस्त्यावर पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने त्याच्या डोक्यावर वार करीत त्याचा खून केला. खून केल्यावर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, काही वेळात त्यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात आत्मसर्मपण केले. घटना धंतोली हद्दीतील असल्याने इमामवाडा पोलिसांनी त्यांना धंतोली पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध कलम ३0२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.