अविनाश पाठक लिखित "थोडं आंबट थोडं गोड" हा ललित लेखसंग्रह उद्या प्रकाशित होणार

July 31,2020

केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार प्रकाशन...


नागपूर, 31 जुलै - नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक  तसेच नागपूर इन्फो डॉट इन (nagpurinfo.in) चे संपादकीय सल्लागार अविनाश पाठक लिखित ‘थोडं आबंट थोडं गोड' हा ललित लेखांचा संग्रह मुंबईच्या भरारी प्रकाशानने ई-बुक म्हणून प्रकाशित केला असून अँमेझॉन -किंडलवर उपलब्ध केला आहे. या पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन सोहळा उद्या दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी १.३० वाजता  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलवाहतूक व जहाजबांधणी आणि लघु तसेच मध्यम उद्योग विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. 

थोडं आंबट थोडं गोड हे पुस्तक अविनाश पाठक यांनी दै. श्रमिक एकजूट नांदेडमध्ये चालवलेल्या उचलली पेन अन्... या स्तंभातील आणि दै. गावकरी नाशिकमध्ये चालवलेल्या संत्रा बर्फी या स्तंभातील निवडक लेखांचा संग्रह असून यात 38 लेखांचा समावेश आहे. यात 16 व्यक्तिंची व्यक्तीचित्रे किंवा आठवणी सांगणारे लेख समाविष्ट असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कांचन गडकरी, डॉ. द.भि. कुळकर्णी, मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. विनय वाईकर, वामनराव चोरघडे, पी.आर. जोशी, विनयकुमार काटे, विकास आणि प्रकाश आमटे, आकाशानंद, स्मिता तळवलकर आणि एकनाथ ठाकूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस, माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे अशा मान्यवरांवरील लेखांचा समावेश आहे. याशिवाय विविध सामाजिक विषयांनाही हात घालणारे लेख या पुस्तकात असून त्यात वृद्धाश्रम आणि बोर्डिंग, लहान वयातला चष्मा, सुजाण  पालककत्व, कांद्याचे वाढलेले भाव अशा विषयांवर राजकारण न आणता ललित अंगाने हे विषय या लेखांमध्ये मांडलेले आहेत. या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे भूतपूर्व  अध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. तर दिवंगत थोर साहित्यिक श्रीमती गिरिजा कीर यांच्या स्मृतिला हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे. 


अविनाश पाठक यांचे प्रकाशित होत असलेले हे 11 वे पुस्तक आहे. या आधी त्यांनी लिहिलेले दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, कालप्रवाहाच्या वळणांवरून हे तीन वैचारिक लेखांचे संग्रह, गाभाऱ्यातला   कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश आणि आठवणीतले नेते हे ललित लेखांचे संग्रह, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, डावपेच हा राजकीय कथांचा संग्रह, मराठी वाड्मय व्यवहार-चिंतन आणि चिंता हा संपादित ग्रंथ आणि काळ्या कोळशाची काळी कहाणी हा कोळसा घोटाळ्याची चिरफाड करणारा ग्रंथ यांचा समावेश आहे. यातील मराठी वाड्मय व्यवहार- चिंतन आणि चिंता हा ग्रंथ महाराष्ट्र शासन आणि रसिकराज नागपूरच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर पूर्णांक सुखाचा या कादंबरीला पद्मगंधा प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डावपेच या कथासंग्रहाला ग्रंथालय भारतीचा पुरस्कार देण्यात आला असून रसिकराज नागपूरच्या पुरस्कारानेही या कथासंग्रहाला गौरविण्यात आले आहे. आठवणीतले नेते या पुस्तकालाही साहित्य विहार या संस्थेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  

यापूर्वीची अविनाश पाठक लिखित सर्व पुस्तके ही मुद्रित आवृत्या म्हणून प्रकाशित झाली होती. मात्र ‘थोडं आंबट थोडं गोड’ हा ललित लेखसंग्रह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल बुक म्हणून प्रकाशित होत आहेत. यापूर्वी आठवणीतले नेते या अविनाश पाठक लिखित पुस्तकाची दुसरी आवृत्ती ही देखील ई-बुक म्हणून प्रकाशित करण्यात आली होती. याशिवाय अविनाश पाठक यांचा सत्तेच्या सावलीत हा राजकीय कथासंग्रह आणि दृष्टिक्षेप हा वैचारिक लेखांचा संग्रह देखील लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. 

‘थोडं आंबट थोडं गोड’ हे अविनाश पाठक लिखित पुस्तक अँमेझॉन  किंडलवर https://www.amazon.in/dp/BO8DR5JY1R/ref=cm_sw_r_wa_awdb_t1_EZfiFb4A7RZ4K या लिंकवर क्लिक करून उपलब्ध होऊ शकेल.