अट्टल वाहनचोरास नागपूर पोलिसांनी पकडले

July 16,2020

नागपूर : १६ जुलै - गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-२ च्या पथकाने भोपाळ येथील अट्टल वाहनचोर तसेच कुख्यात गुन्हेगारास अटक केली आहे. भोपाळ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर नागपुरात आलेल्या भोपाळ पोलिसांच्या हवाली हा आरोपी करण्यात आला आहे. 

पेटजेलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जरीपटका येथील रहवासी आरोपी लालचंद गोवर्धनदास आसवानी (४५ वर्ष), रा.प्लॉट नं.५, बॅरेक एच.१८, बैरागढ भोपाळ, म.प्र. ह.मु. दयानंद पार्कमागे, जरीपटका यास ताब्यात घेतल्यानंतर सखोल विचारपूस केली. त्याने भोपाळ, मध्यप्रदेश येथील पोलिस स्टेशनच्या हद्दीतून दोन अँक्टिव्हा मोपेड चोरी करून नागपुरात आणल्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्हय़ातील दोन अँक्टिवा मोपेड वाहन एकूण किंमत १ लाख रुपये जप्त करण्यात आले. भोपाळ येथील संबंधित पोलिस स्टेशनला तात्काळ ई-मेल तसेच मोबाईल फोनद्वारे कळविण्यात आले. भोपाळ येथील पोलिस पथक नागपुरात आल्याने आरोपी व जप्त वाहनेही त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. 

नमूद इसमांबाबत भोपाळ पोलिस पथकास विचारपूस के ली असता, आरोपी इसम हा कु ख्यात गुन्हेगार व अट्टल वाहन चोर असून त्याच्याविरुद्घ बैरागढ, भोपाळ येथे पोलिसांवर हल्ला करणे, खूनाचा प्रयत्न जबरी चोरी, घरफोडी, रा.सु.का., हत्यार कायदा, दारूबंदी कायदा असे एकूण ४७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरची कार्यवाही अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. नीलेश भरणे, पोलिस उप-आयुक्त (डिटेक्शन) गजानन शिवलिंग राजमाने, सहायक पोलिस आयुक्त सुधीर नदंनवार, पोलिस निरीक्षक भानूदास पिंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर, मोहन शाहू, संतोष मदनकर, रामनरेश यादव, रवी शाहू, शेषराव राऊत, योगेश गुप्ता, निनाजी तायडे यांनी केली.