विकास दुबेच्या एन्काऊंटरची होणार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

July 16,2020

लखनौ : १६ जुलै - उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय नवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या विशेष पोलीस पथकाने विकास दुबेला चकमकीत ठार केले. विकास दुबे आणि त्याच्या टोळीने उत्तर प्रदेशच्या आठ पोलिसांची हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता. मध्य प्रदेशातून अटक करून उत्तर प्रदेशला आणत असताना विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी चकमकीत त्याला ठार करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालायात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाच्या देखरेखेखाली सीबीआय किंवा एनआयएच्या मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला कोणत्या प्रकारची समिती हवी आहे, अशी विचारणा केली असून उत्तर देण्यासाठी गुरुवारपर्यंत वेळ दिला आहे. २0 जुलै रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. तेलंगणमध्ये केले तसेच काहीसे आम्ही येथे करू. कोणत्या प्रकारची समिती तुम्हाला हवी आहे ते सांगा, असे सरन्यायाधीशांनी तेलंगणच्या एन्काउंटरचा उल्लेख करताना म्हटले आहे. तेलंगण पोलिसांनी २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून हत्या करणार्या चार आरोपींना चकमकीत ठार केले होते. ताब्यात असणार्या आरोपींनी आपल्यावर काठी आणि दगडाने हल्ला करण्यास सुरुवात केल्याने त्यांना ठार केल्याचे तेलंगण पोलिसांनी सांगितले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने लगेचच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. अद्याप समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही. सुनावणीदरम्यान योगी आदित्यनाथ सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारला अजून थोडा वेळ देण्याची मागणी केली.