मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यात शेतीचे नुकसान

July 16,2020

यवतमाळ: १६ जुलै - कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटातून सावरणाऱ्या बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवलं आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये नुकतंच लावलेलं पीक वाहून गेल्यानं बळीराजासमोर जगाचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा यवतमाळमधील नेर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला.

पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आणि पुराचा फटका बळीराजाला बसला. मंगलादेवी,  गौळण, माणिकवाड, पिंपरी मुक्तापूर, अजंती शिरजगाव, वटफळी, मालखेड, या गावातील शेकडो एकर शेतातील पिकं पाण्याखाली गेली. एकाच दिवसात नेर तालुक्यात 56 मिलिमीटर पाऊस कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील मांगलादेवी लगत असलेल्या मिलमिली नदीला पूर आला. नदीलगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहानं नुकतीच लावलेली छोटी रोपंही आपल्यासोबत नेली.