नाल्याच्या पुरात मायलेकी गेल्या वाहून

July 16,2020

यवतमाळ : १६जुलै- यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील माय-लेकी शेतामधून घरी परत येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेल्या.

नाल्या शेजारी असलेल्या एका शेतात मुलीचा तर काही अंतरावर आईचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कविता किशोर राठोड व निमा किशोर राठोड अस मृत मायलेकीचं नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, कविता राठोड आणि त्यांची 15 वर्षाची मुलगी निमा या शेतात निंदण्यासाठी गेल्या होत्या. आरंभीसह परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मायलेकी घरी परत येत असताना आरंभी-चिरकूटा मार्गावरील नाल्याला पाणी वाहत होतं. कविता आणि निमा या दोघी पुलावरून येत असताना अचानक पाण्याच्या लोंढा आला. त्यात दोघी मायलेकी वाहून गेल्या.

या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी दोन्ही मायलेकींचा शोध सुरू केला. दिग्रस तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागची चमू देखील तातडीनं घटनास्थळी पोहोचला. दोघींचा शोध घेतला असता नाल्याशेजारी असलेल्या एका शेतात मुलगी निमाचा तर काही अंतरावर तिची आई कविताचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी दिग्रस पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मायलेकीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.