चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून चांगला पाऊस

July 16,2020

चंद्रपूर : १६जुलै - चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या फक्त निम्माच पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना या पावसाची मोठी प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांना बहुप्रतीक्षित असलेला हा पाऊस गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसला पण या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झालाय तर काहींच्या शेतात पाणी साचलंय. पावसाने थोडी उघाड दिल्यास हे पाणी मुरण्यास मदत होईल आणि पिकाला याचा फायदा होईल. पण पावसाने पुन्हा संततधार लावली तर शेतात पाणी साचलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसाने धान पिकाला चांगला फायदा झालाय. लावणीसाठी तयार केलेल्या धानाच्या बांद्यांमध्ये पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापसाच्या पिकावर या पावसाचा संमिश्र परिणाम दिसून आला आहे.