नागपूर विभागात १२वीचा निकाल यंदा ९१.६५ टक्के

July 16,2020

नागपूर : १६ जुलै - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या फेब्रुवारी २०२० मध्ये घेतलेल्या १२ वीच्या परीक्षांमध्ये नागपूर विभागाने घेतलेल्या परीक्षांचे निकालही आज दुपारी १ वाजता जाहीर झाले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी हे निकाल जाहीर केले. नागपूर विभागात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.६५ टक्के इतके असल्याचे सांगण्यात आले. 

नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या जिल्ह्यातील प्रमाण ९४.१३ टक्के तर सर्वात कमी वर्धा जिल्ह्यातील प्रमाण ८७.४० टक्के इतके आहे. याशिवाय  भंडारा ९३.५८ टक्के, चंद्रपूर ९०.६० टक्के, नागपूर ९२.५३ टक्के आणि गडचिरोली ८८.६४ टक्के असे प्रमाण आहे. 

नागपूर विभागात एकूण १५६,८७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील १,४३,७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.