पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कर्मचारीच चालवताहेत वरली मटका

July 13,2020

अमरावती : १३जुलै - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एक पोलीस कर्मचारी वरली मटका चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोपनीय माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात आज या पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे अंजनगाव सुर्जी येथे खळबळ उडाली आहे.

विजय घुले, असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. हा स्वतःच्या घरातूनच वरली मटका चालवत असल्याची माहिती प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, पोलीस अधिकारी विशाल पोळकर तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी विजय घुले याच्या श्रद्धानंद नगर येथील राहत्या घरी धाड टाकून घराची झडती घेतली. यावेळी वरली मटक्याचे साहित्य, मोबाईल, डायरी आदी साहित्य पोलिसांना सापडले.

या प्रकरणी पोलिसांनी शिपाई घुले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिपायाची चौकशी केली असता त्यातून वरली मटका व्यवसायातील काही नावे समोर आली आहेत. पोलिसांनी विजय घुले, निलेश रमेश मोरे, मंगेश पंजाब चौधरी आणि काशीराम नारायण गौर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने पोलीस खात्यासह अंजनगाव सुर्जी येथे खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.