आईच्या विवाहबाह्य संबंधांतून पाच वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

July 13,2020

हैद्राबाद : १३ जुलै - आईच्या विवाहबाह्य संबंधांतून पाच वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील घाटकेसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुलीच्या मृत्यूने दु:खी झालेल्या पित्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीसह मुलीची आई आणि आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबादमधील घाटकेसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षीय मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर तिच्या दु:खी वडिलांनी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. आठवडाभरापूर्वीच या मुलीची हत्या करण्यात आली होती. 

आईच्या विवाहबाह्य संबंधांतून ही हत्या झाल्याचे चौकशीनंतर स्पष्ट झाले आहे. कल्याण राव असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे. सरकारी विभागात तो नोकरी करत होता. कल्याण राव याने भोंगीर रेल्वे स्थानकात ट्रेनसमोर उडी मारून स्वत:ला संपवले. तर आध्या असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तिची करुणाकर नावाच्या व्यक्तीने गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी मारेकरी करुणाकर आणि मुलीच्या आईसह अन्य एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. फेसबुकच्या माध्यमातून मुलीची आई अनुषा हिची ओळख करुणाकर आणि राजशेखर यांच्याशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढली. या अवैध संबंधांमुळे कुटुंबात वाद वाढले. घटनेच्या दिवशी करुणाकर याने अनुषा हिला राजशेखरसोबत पाहिले. त्यानंतर तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर करुणाकर याने रागाने चिमुकलीला ठार मारले.