देशात जैविक इंधन निर्मिती केल्यास २ लाख कोटींची आयात कमी होईल : गडकरी

July 13,2020

नागपूर : १३जुलै - देशात दरवर्षी सात कोटींच्या क्रूड ऑईलची आयात कमी करायची असेल तर जैविक इंधन अर्थव्यवस्थेला अधिक चालना द्यावी लागेल व त्यासाठी अधिकाधिक जैविक इंधन निर्मिती आपल्या देशात झाली तर किमान दोन लाख कोटींनी ही आयात कमी होऊ शकते, असे मत केद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

गडकरी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. वाहतुकीसाठी बायो डिझेल, इथेनॉल, मिथेनॉल, इलेक्ट्रिक व सीएनजीचा वापर अधिक वाढला पाहिजे. त्यामुळे जैविक इंधनाची ही अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असे सांगून गडकरी यांनी एमएसएमईचे सकल राष्ट्रीय उत्पन्न पाच वर्षात ३0 टक्क्यांहून ५0 टक्क्यापर्यंत नेणार असल्याचे सांगितले. तसेच निर्यात ४0 टक्क्यांहून ६0 टक्क्यांपर्यंत तर रोजगार ११ कोटींवरून १६ कोटींवर नेण्याचा मनोदय गडकरी यांनी व्यक्त केला. ६ लाख उद्योगांची पुर्नबांधणी आम्ही मार्चपर्यंत केली. ती मुदत आता डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली असल्याचेही गडकरी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी बाजारात खेळते भांडवल येणे व उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत १५ लाख कोटींची रस्ते बांधणीचे आमचे लक्ष्य असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, २२ हरित राष्ट्रीय महामार्ग आम्ही बांधले आहेत. या महामार्गाशेजारची जागा विविध उद्योगांच्या क्लस्टरसाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रस्त्याशेजारी लागणार्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देता येतील, असेही ते म्हणाले.

विमानतळ, बस स्टेशन, ऑटोमोबाईल क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीची क्षमता अधिक आहे. येत्या ५ वर्षात भारत ऑटोमोबाईल क्षेत्रात मॅन्युफॅरिंग हब होईल असे सांगताना गडकरी म्हणाले, जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहे. पेन्शन, शेअर आणि विमा क्षेत्रात गुंतवणुकीच्या अधिक संधी आहेत. त्यादृष्टीने जगातील गुंतवणूकदार भारताची निवड करू शकतात. देशात सर्वच क्षेत्रात गुंतवणूक करण्यास मोठी संधी आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने चीनशी व्यवहार करण्याची इच्छा गुंतवणूकदारांची नाही, अशा स्थितीत भारत हे एक योग्य क्षेत्र गुंतवणुकीसाठी आहे, असेही ते म्हणाले.