जया बच्चन वगळता संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित

July 13,2020

मुंबई : १३ जुलै - ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन वगळता अख्खे बच्चन कुटुंब कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आहे. यात महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि नात आराध्या यांचा समावेश आहे. जया बच्चन यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. पितापुत्रावर नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटलमधील आयसोलेशन युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यावरील उपचारासंबंधी अद्याप कोणताही तपशील मिळू शकला नाही.

माहितीनुसार, अमिताभ यांना शनिवारी सकाळी हलका ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत होती. तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांत अभिषेक यांचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाल्याने दोघांनाही रात्री नानावटी रुग्णालयात भरती केले. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड-१९ ची काहीशी लक्षणे आहेत. याबाबत अमिताभ यांनीही शनिवारी स्वत: टि्वटरद्वारे माहिती दिली होती. मी कोरोना पॉझिटिव्ह असून, घरातील सदस्यांच्याही चाचणी करण्यात आल्या आहे. मागील १० दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.

शनिवारी जया, ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. आज मात्र जया वगळता अन्य दोघी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्या. मात्र, दोघींना रुग्णालयात दाखल करणार की घरीच क्वारन्टाईन राहणार याबद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. रविवारी सकाळी बच्चन यांचा जलसा बंगल्याचे पूर्णपणे निजर्तंुकीकरण करण्यात आले असून, अन्य दोन प्रतीक्षा आणि जनक बंगल्यांचेही निजर्तंुकीकरण होणार असल्याचे समजते.

मे महिन्यात अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती-१२ साठी काही प्रोमोज आपल्या घरीच शूट केले होते. दंगल आणि छिछोरे चित्रपटाचे दिग्दर्शक नीतेश तिवारी यांनी रिमोटद्वारे दिग्दर्शन केले होते. एका माहितीनुसार, अमिताभ बच्चन १० दिवसांपूर्वी एका जाहिरातीच्या डबिंगसाठी आपल्या कार्यालयातील स्टुडिओत गेले होते. याच ठिकाणी त्यांना संसर्ग झाला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र, या वृत्ताला कुणी दुजोरा दिलेला नाही.

अमिताभ बच्चन यांच्यासह सर्वांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी कोेलकातामध्ये श्यामबाजार येथील शिव मंदिरात यज्ञ करण्यात आला. ऑल सेलिब्रिटी फ्रेण्ड्स क्लबच्या सदस्यांनी बेहाला येथील परिसरात पूजा आयोजित केली होती. याशिवाय उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात मंत्रोच्चाराच्या घोषात जलाभिषेक करण्यात आला असून, महामृत्युंजय मंत्राचे पठण केले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अमिताभ यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळीदेखील याच मंदिरात पूजा करण्यात आली होती.