राजस्थानमधील घटनाक्रमामुळे कपिल सिब्बल अस्वस्थ

July 13,2020

नवी दिल्ली : १३ जुलै - मध्यप्रदेश हातातून गेल्यावर राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारमध्येही निर्माण झालेल्या तणातणीमुळे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल अस्वस्थ झाले आहेत. कॉंग्रेस पक्ष ज्या दिशेने जात आहे, त्याबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली. मला पक्षाची काळजी लागली आहे. तबेल्यातून घोडे पळाल्यावर आम्ही जागे होणार का, असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.

कॉंग्रेस आणि काही अपक्ष आमदारांना लाच देऊन भाजपा राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी केला होता. यामुळे राज्यात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी ही काळजी व्यक्त केली. दरम्यान, कॉंग्रेसमधील अंतर्गत वादापासून लक्ष भरकटवण्याच्या प्रयत्न अशोक गहलोत करीत असल्याचे स्पष्ट करीत भाजपाने हे आरोप फेटाळले होते. कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात गहलोत सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही भाजपाने केला आहे.