नवेगाव राष्ट्रीय उद्यानात सापडला दुर्मिळ गिरगिट जातीचा सरडा

July 09,2020

गोंदिया: ९ जुलै - नवेगाव राष्ट्रीय उद्यानाजवळील नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये सोमवार दि. ६ जुलै रोजी दुर्मिळ असा रंग बदलणारा गिरगिट प्रजातीचा सरडा आढळला. त्याला नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात सोडण्यात आले. 

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे गाईड कैलास लाडे यांना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील धाबेटेकडी- पवनी मार्गावर रंग बदलणारा सरडा आढळला. त्याला सुरक्षितरित्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात आणल्यानंतर नावेगावबंधचे वनरक्षक अमोल चौबे यांनी त्याचे छायाचित्र घेऊन उद्यान परिसरातील जंगलात सोडून दिले. हा सरडा गिरगित नावाने ओळखला जातो. इंग्रजीमध्ये याला इंडियन चामेलॉन असे म्हटले जाते. हा सरडा श्रीलंका, भारत, दक्षिण आशिया व इतर भागात आढळतो. या सरड्याची विशेषतः म्हणजे तो ज्या झाडावर किंवा ठिकाणी बसलेला असतो त्या रंगानुसार आपला रंग बदलू शकतो. जेणेकरून इतर शिकारी पक्ष्यांपासून रक्षण होऊ शकेल. महत्वाचे म्हणजे हा सरडा आपले डोळे चारही बाजूला फिरवून पाहू शकतो, असे सडक अर्जुनी येथील वन्यजीवप्रेमी शहाबाज शेख यांनी सांगितले.