गोंदियात शेतकऱ्याची आत्महत्या

July 05,2020

गोंदिया : ५जुलै  - गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पुराडा या गावातील एका शेतकऱ्याने दुबार पेरणीच्या संकटाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थितीवर मात करून धानाची लागवड केली. मात्र, पावसाअभावी पीक करपू लागले. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर आधिच सावकराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे ? या विंवचनेतून पुराडा येथील शेतकऱ्याने  आपले जीवन संपवले आहे. श्रीराम चैनलाल उईके (५७ ) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. कर्जबाजारीपणा आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातूनच वाढत्या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. पुराडा येथील शेतकरी श्रीराम देखील पैसा कमविण्यासाठी नंदुरबारला गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे हातचे काम गेले. परिणामी बेरोजगार झालेले श्रीराम गावाकडे परतले होते. गावात आल्यार पेरणीचा हंगाम तोंडावर आला होता. त्यामुळे त्यांनी शेतात कशीबशी खरीप हंगामात धानाची पेरणी केली. मात्र पावसा अभावी पीक करपू लागले होते. त्यामुळे त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते.

श्रीराम यांच्यावर सावकाराचेही कर्ज होते, ते त्यांना आता डोईजड झाले होते. त्यातच हातचे काम गेले होते. शेतातील पीकही करपू लागले होते. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली. पेरणीसाठी हातात पैसे नाहीत, अगोदरच लोकांकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे या सर्व आर्थिक विंवचनेतून श्रीराम यांनी विषारी औषध पिऊन आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर श्रीराम यांचा मृतदेह देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.