आता पाणीपुरीही एटीएमवर मिळणार

July 05,2020

आसाम : ५ जुलै - सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हणतात. आपल्या जिवनातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीत तंत्रज्ञानाचा वापर होत असतो. मात्र काही गोष्टींमध्ये भारतीय लोकं या मुळे स्वरुपात करणं पसंत करतात. उदाहरणार्थ, पाणीपुरी खाणं… मित्र-परिवारासोबत बाहेर गेल्यानंतर रस्त्यावर गाडी दिसली की पाणीपुरी खाणं आणि त्यानंतर एक्स्ट्रा पुरीसाठी वाद घालणं आतापर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाने केलं असेल. पण आता या पाणीपुरीचा एक अत्याधुनिक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने बनवलेल्या पाणीपुरीच्या एटीएमचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

आसाम पोलीस दलात अतिरीक्त पोलीस महासंचालक हार्डी सिंग यांनी पाणीपुरीचं एटीएम बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण एटीएममधून पाणीपुरी कशी मिळवायची याची कृती सांगताना दिसत आहे. हे एटीएम तयार करण्यासाठी आपल्याला सहा महिन्याच्या कालावधी लागल्याचंही या तरुणाने सांगितलं आहे.

हा तरुण नेमक्या कोणत्या भागातला आहे हे समजलं नसलं तरीही त्याच्या बोलण्याच्या लकबीवरुन तो राजस्थान किंवा गुजरातमधील असावा असा अंदाज हार्डी सिंग यांनी व्यक्त केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे.