गडचिरोलीत २२ सीआरपीएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह

July 05,2020

गडचिरोली : ५जुलै -  दुसऱ्या राज्यातून गडचिरोली शहरात आलेल्या २२ जणांना कोविड-१९ ची बाधा झाल्याने खळबळ माजली आहे. शिवाय भंडारा जिल्ह्यातून भामरागड तालुक्यात आलेला एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. गडचिरोली शहरातील २२ रुग्ण हे केंद्रीय राखीव दलाच्या १९२ बटालियनचे जवान आहेत.

काल रात्री आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार सर्व २३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे. सीआरपीएफचे २२ जवान बाहेर राज्यातील असून, सुट्यांवरुन नुकतेच गडचिरोली शहरात दाखल झाले होते. लगेच त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यापूर्वी अहेरी व देसाईगंज येथील प्रत्येकी एका जवानाचा अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला होता. तेदेखील बाहेरुन आले होते. आता तब्बल २२ जवान कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

सुटीवर असलेले २३ जवाना नागपूरहून २७ जूनला गडचिरोलीत आले होते. संस्थात्मक विलगीकरणात ठेवल्यानंतर २३ पैकी १८ जण पॉझिटीव्ह आढळले, तर ५ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला. इतर ४ जवान खासगी वाहनाने गडचिरोली आले होते. त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून, ५९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत, तर सध्या १३ सक्रिय कोरोनाबाधितांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. आज पॉझिटीव्ह आढळलेले सर्वच रूग्ण बाहेरील राज्य व जिल्हयातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या त्या जिल्हयात तसेच राज्यात करण्याची प्रक्रियास प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील आतापर्यंतची एकूण बाधित संख्या ७३ राहणार आहे. या रुग्णांच्या नोंदी पोर्टलवर सायंकाळपर्यंत राज्यस्तरावरून त्या त्या ठिकाणी अपडेट केल्या जाणार आहेत. २३ पैकी ७ नोंदी राज्य स्तरावरून मंजूर झाल्याने त्या त्या जिल्हयात शिफ्ट केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी शिफ्ट करणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.