वाशीम जिल्ह्यात झाली ढगफुटी, खरीप हंगामाला बसणार फटका

July 05,2020

वाशिम -५ जुलै - वाशीम  जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यातील शिरपूर, एरंडा, भोयता, बोराळा या भागातील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या खरीप हंगामात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

मालेगाव तालुक्यातील शिरपूर इथल्या नाल्याला पूर आल्याने वाघी, खंडाळा, गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच शिरपूर-करंजी रस्त्यावरील शिरपूर नजीकच्या नाल्याला पूर आल्याने शिवारातील शेतकरी दोन्ही बाजूला अडकून पडलेत. एरंडा, भोयता, बोराळा येथे मुसळधार झालेल्या पावसामुळं नदी, नाले भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी पाणी शेतामध्ये उभे राहिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे काही जणांचे पेरलेले बियाणे वाहून गेल्याचेही चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. पुराच्या पाण्यात अडकेलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी दोराच्या सहाय्याने प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले.