वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

July 05,2020

चंद्रपूर : ५ जुलै -  चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तहसील अंतर्गत येणार्‍या तळोधी वन परिक्षेत्रात येणार्‍या हिंगणापूर बिटात काम करीत असताना शेतमजूर मारोती उइके (वय ४0) सोनुली बु. याला वाघाने हल्ला करून ठार केले. मारोती हिंगणापर बिटात काम करीत असताना शनिवारी दुपारी १२ वाजता वाघाने हल्ला करून ठार केले. त्याच्यापश्‍चात पत्नी व ३ मुले आहेत. घटना समजताच वन परिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी चमूसह भेट दिली आहे. तहसीलअंतर्गत येणार्‍या अनेक गावात वन्यप्राण्यांच्या वावर वाढला आहे. त्यातच काही दिवसांपूूर्वी तुकूूम येथे वाघाने गणवीर नावाच्या शेतकर्‍याला ठार केले असतानाच शनिवारी, ४ जुलै रोजी सोनुली येथे शेतमजूर मारोती उइके याला ठार केल्याने घोडाझरी अभयारण्य हे दिवसेंदिवस माणसांना घातक होत असताना दिसत आहे. घोडाझरी अभयारण्य म्हणून घोषित केले असल्याने वनाचे रक्षण व्हावे म्हणून अनेक वाघ सोडले असल्याची चर्चा होत आहे. नागभीड तालुक्यात अनेक गावांना जंगल लागून आहे. त्यामुळे दैनंदिन कामासाठी शेतात जावेच लागते. वन्यप्राणी व मानव संघर्ष होत आहे. वन विभागाने यावर योग्य पाऊले उचलावीत अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.