अत्यवस्थ वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू

July 05,2020

नागपुर : ५ जुलै - नागभीड तालुक्यातील ब्राह्मणी गावातून पट्टेदार वाघिणीला काही दिवसांपूर्वी वनविभागाने जेरबंद केले. वाघीण जखमी असल्याने तिला पुढील उपचारासाठी २२ जूनला पहाटे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले. अत्यवस्थ असलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र मींडळा व नियतक्षेत्र मंगलीमधील ब्राह्मणी या गावात पिंटू देशमुख यांच्या शेतात शिरलेल्या जखमी वाघिणीस जेरबंद करण्यास वनविभागाला २१ जूनला यश आले. त्यामुळे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशान्वये तिला २२ जूनला पहाटे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले तिला आणल्यानंतर वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथील पशुवैद्यकीय तज्ञांनी प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच, गोचीड मोठ्या प्रमाणावर आढळल्याने तीव्र रक्तशय  होता. तिच्या स्थितीवर पशुवैद्यक बारीक लक्ष ठेऊन होते आणि उपचार सुरु होते. २७ जूनला तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. २८ जूनला प्रकृती समाधानकारक होती. परंतु शेवटपर्यंत या वाघिणीच्या प्रकृतीत सुधारणा होऊच शकली नसल्याने शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. या वाघिणीला कोरोनाची लक्षणे नसली तरी तिचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गोरेवाडा प्राणिसंग्रहालय परिसरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.