शरद पवारांनी केले उद्धव ठाकरेंशी गुफतगू

July 04,2020

मुंबई, 4 जुलै - राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यावर तसेच लॉकडाऊन उठविण्याबाबत नेमके काय करावे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली.

मुंबईच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे स्मारकात ही बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनच्या गोंधळावर चर्चा झाल्याचीही चर्चा आहे. मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये लॉकडाऊन कडक करताना, वेगवेगळे नियम लागू  केल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. मंत्र्यांना न विचारताच लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीही नाराज आहेत. याबाबतही पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे कळते.

या बैठकीनंतर आता लॉकडाऊनबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर सरकार चालवताना तीन पक्षात समन्वय ठेवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जाते.  लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेतला जात असल याची तक्रार महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे  बोलले जाते.