वीज सुधारणा विधेयक घटनाविरोधी, राज्यांना विश्‍वासात घ्या डॉ. नितीन राऊत

July 04,2020

नागपूर, 4 जुलै - केंद्राचे प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक घटनांविरोधी असून राज्यांना विश्‍वासत घेऊनच विधेयकात सुधारणा करावी, अशी आग्रही भूमिका ऊर्जामंत्री डॉ. नितीनराऊत यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून आयोजित परिषदेत मांडली. प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक 2020 संदर्भात चर्चेसाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री,ऊर्जामंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सहभागीच्या भावना जाणून घेतला. हे विधेयक राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे असून त्याद्वारे घटेतील संघ राज्याच्या व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. केेंद्र सरकारने या संबंधातील सर्व घटकांशी विचार विनिमय  करूनच निर्णय घ्यावा तसेच विविध राज्यांच्या प्रस्तावावर सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी मागणी डॉ.राऊत यांनी केली.

कोरोनाकाळात सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करून खासगी वीज उद्योगांना मागील दाराने प्रवेश देऊ नये. असेही त्यांनी सांगितले.