सुपर बाईकची मोहिनी...

June 29,2020

नागपूर : २९ जून - माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपले छंद कधीच विसरत नाही. संधी मिळाली की आपला छंद माणूस पूर्ण करून घेतोच देशातील जेष्ठ नेते शरद पवार यांना जीप चालवण्याची प्रचंड आवड होती हि आवड मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी अनेकदा पूर्ण केली. देशाचे संरक्षणमंत्री असताना चक्क दोरखंडाच्या लटकून एका जहाजातून दुसऱ्या जहाजात जाण्याचा साहसी चमत्कार पवारांनी घडवला होता. देशाचे पंतप्रधान राजीव गांधी हे देखील विमान चालवण्याची हौस अनेकदा पूर्ण करून घ्यायचे. 

अशाच हौशी उच्चपदस्थांमध्ये देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हेदेखील आहेत.  न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर ते दिल्लीत होते. न्या. शरद बोबडे हे मूळचे नागपूरचे आहेत आणि लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या घरी आले आणि सध्या नागपुरातच मुक्कामी आहेत .आपल्या घरूनच ते सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी घेत आहेत.

न्यायमूर्ती बोबडे आज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांनी हार्ले डेव्हीडसनची सुपर बाईक नजरेला पडली.  बाईकची प्रचंड क्रेझ असल्यानं, या धाकड बाईकवर बसण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.बाईकच्या मालकाची परवानगी घेऊन सरन्यायाधीश बाईकवर बसले आणि हे दृश्य टिपण्यासाठी सगळ्यांचेच मोबाईल सरसावले.

शरद बोबडे यांना वाचनाचा, फोटोग्राफीचा आणि क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. त्यासोबतच त्यांची नवी पॅशन आज सगळ्यांना समजली.याआधी, जानेवारी महिन्यात नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या एका मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात सरन्यायाधीशांची बॅटिंग सगळ्यांनी पाहिली होती.तंत्रशुद्ध फलंदाजीचं दर्शन घडवत त्यांनी ३० चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या होत्या. 

सरन्यायाधीशांच्या या नव्याने लक्षात आलेल्या हौसेची आज नागपुरात दिवसभर चर्चा होती.