अखेर पतीला मृत पत्नीचे अंत्यदर्शनही घेता आले नाही

June 29,2020

मुंबई : २९ जून - कोरोनामुळे जिवाभावाच्या नात्यांची ताटातूट होत आहे. अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना मुंबईच्या मुलुंड येथील रुग्णालयात घडली. पत्नीचे रुग्णालयात निधन झाल्यानंतर अलगीकरणात असलेल्या पतीला तिच्या अंत्यसंस्काराला जात आले नाही. पत्नीला अखेरचे पाहताही आले नाही. या जीवघेण्या दुःखाने अलगीकरण केंद्रामध्ये पतीने हंबरडा फोडला. या आक्रोशाने आणि पती - पत्नीच्या या ताटातुटीने अनेकांचे हृदय हेलावले. 

ठाण्याच्या तीन हात नाका परिसराला कोरोनाचा विळखा पडला आहे. हा परिसर ठाणे आणि मुलुंडच्या मध्यावर आहे. मधुमेहाने आजारी असलेल्या  पत्नीला कोरोनाची बाधा झाली होती. उपचारासाठी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने त्यांना मुलुंड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान पतीसह दोन मुले कोरोनाबाधित झाल्याने त्या सर्वांना जवळच्या अलगीकरण केंद्रात दाखल केले होते. रुग्णालयात पाचव्या दिवशी पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान ज्या दिवशी पत्नीचा मृत्यू झाला, त्या दिवशी विद्युत दाहिन्यांमध्यें आधीच प्रेतांचा खच पडला असल्याने मृतदेह रुग्णालयातच ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

 अलगीकरणात असलेल्या पतीला अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मिळाली नाही. या दुःखाने पतीने  अलगीकरण केंद्रात हंबरडा फोडला. कोरोना चाचणीत निगेटिव्ह आलेला एक मुलगा आणि काही नातेवाईक यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले, मात्र कोरोनाने पती - पत्नीची ताटातूट केली.