घ्या समजून राजे हो - मानवजातीच्या भल्यासाठी निसर्गाचा समतोल सांभाळला जायलाच हवा...

June 07,2020

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये फटाके भरून ठेवलेले अननस खाण्यात आल्याने एका हत्तीणीचा दुर्दैैवी मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या देशभर गाजते आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पशुसंरक्षक सक्रिय झालेले आहेत. या पाठोपाठ आता या  घटनेवर राजकारणही सुरु झालेले दिसते आहे.

माणूस असो किंवा पशू, त्याचा जीव जाणेे वाईटच, आणि त्यातही त्याचा जीव घेतला जाणे हे अधिकच वाईट ठरते. त्यातही आता एकूणच जगात वन्यप्राणी कमी होताना दिसत आहेत. अनेक पशूपक्षांच्या जमाती नष्ट होताना दिसत आहेत. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी हे अस्वस्थ होणे यात काहीही गैर नाही. असे असले तरी अशी पशू हत्या करण्याची वेळ का येते आहे आणि त्यावर नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जायला हव्या यावर फारसा विचार होताना  दिसत नाही हे दुदैव्य येथे नमूद करावेच लागेल.

नियतीने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा जमीन आणि पाणी अशा दोन व्यवस्था तयार केल्या. यात जशी मानव जात तयार केली तसेच विविध प्राणी आणि पक्षीही तयार केले. जमिनीवर जंगले, डोंगर असेही तयार केले. त्याचप्रमाणे मानव जातीला राहण्यासाठी नागरी वस्त्यांचीही व्यवस्था केलेली आहे. यात मग माणसांना उपयोगी ठरणारे आणि माणसांसोबत वावरू शकणारे गाय, बकरी, घोडा असे पाळीव प्राणी जसे तयार केले तसेच वाघ, सिंह, अस्वल, लांडगा असे  वन्यप्राणीही तयार केले. या सर्वांच्याच पोटापाण्याची सोयही नियतीने केली होती. वन्यप्राणांमध्ये बरेचसे प्राणी हे मासांहारी होते. जंगलात असलेल्या इतर तृणभक्षी जनावरांची आणि पक्ष्यांची हत्या करून हे हिंस्त्र पशू आपले पोट भरत असत.  जंगलातच या हिंस्त्रपशूंसाठी जलाशयही होते. त्यामुळे नागरी वसत्यांपासून हे प्राणी दूरच असायचे. त्यामुळे हिंस्त्र प्राणी नागरी वस्त्यांमध्ये येऊन त्यांनी माणसांवर हल्ला करण्याचे प्रसंग कमी येत होते. अर्थात प्राचीन काळापासून या पशू- पक्ष्यांची शिकार करण्याची माणसाची हौस लक्षात घेता असे शिकारी जंगलात जायचे. इतरही काही कारणाने माणूस जंगलात गेला तर त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाण थोडेफार होते. मात्र असे प्रसंग वगळता वन्यप्राणी आणि मनुष्य हे   आपापल्या क्षेत्रात वेगवेगळे सुखाने नांदत होते.

मात्र गेल्या सहस्त्रकामध्ये मानवाच्या विस्तारवादी प्रवृत्तीने उचल खाल्ली. परिणामी जंगले तोडली गेली आणि शहरे तयार झाली. जलाशय बुजवले गेले आणि नद्यांवर बांध घातले गेले. काही ठिकाणी डोंगरही भुईसपाट केले गेले. यामुळे  निसर्गाचा समतोल बिघडण्यास सुरुवात झाली. याचे ताजे उदाहरण द्यायचे तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईचे देता येईल. 1960 ते 1970 या दशकात मुंबईत समुद्राकाठच्या भागात भर टाकली गेली आणि तिथे नागरी वस्त्या तयार झाल्या. आज नरिमन पाँईंटजवळचा किंवा वांद्ˆयांचा रेकल्मेशन म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आहे. येथे समुद्र बुजवला गेला त्यामुळे मुंबईत समुद्राच्या भरतीच्या वेळी जर मुसळधार पाऊस झाला तर संपूर्ण मुंबई शहरात पाणी तूंबून मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात झाली. ही समस्या आजही तशीच आहे.

जशी समुद्रात भर घातली गेली तशीच मुंबई आसपासची जंगलेही तोडली गेली. जुना इतिहास सांगतो की खरी मुंबई ही बोरीबंदरपासून (आजचे फोर्ट) तर दादरपर्यंत होती. पलीकडे माटूंगा, सायन, कुर्ला, माहिम, वांद्रा ते थेट मुलूंड  अंधरेरीपर्यंत सर्व छोटी छोटी खेडी होती. आजपासच्या परिसरात घनदाट जंगल होते. मात्र 1950 नंतरच्या विस्तारवादी धोरणामुळे या भागातील सर्व जंगले तोडली गेली आणि इथे काँक्रीटची जंगले उभी राहिली.  जो प्रकार मुंबईत झाला तोच इतरत्रही झाला. नागपूरबाबत सांगायचे झाल्यास आजचा महाल परिसर हे जुने नागपूर होते. या नागपूरची मर्यादा सध्याच्या लोखंडीपुलापर्यंत होती. इतकेच काय सीताबर्डीचा किल्ला हा सुद्धा गावाबाहेर होता. आजचे नागपूर हे थेट  बुटीबोरीपर्यंत पोहोचले आहे. तर दुसर्‍या बाजूने कोराडीही जवळ केली आहे. तोच प्रकार कळमना आणि वाडीचाही आहे.

जशी मुंबईला समुद्रात भर घातली गेली तशीच विदर्भात मालगुजारी तलावातही भर घातली गेली आहे. कागदोपत्री विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये 8500 माजी मालगुजारी तलाव कागदोपत्री आहेत. मात्र प्रत्यक्षात या तलावांमध्ये भर टाकून त्यावर अवैध वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. या मुद्यावर अनेकदा विधीमंडळात चर्चा होते. या वस्त्या हटवल्या आणि या तलावातील भर उपसली तर नागपूर विभागातील सिंचन समस्या संपुष्टात येईल असे तज्ज्ञांचे मत  आहे. मात्र हे करण्यासाठी हवी असलेली राजकीय इच्छाशक्ती कोणत्याही राज्यकर्त्याने दाखवले नाही. एकूणच मानवाच्या विस्तारवादी प्रवृत्तीने हा निसर्गाचा समतोल पार बिघडवून टाकला आहे. त्यामुळे आज जगात ग्लोबल वॉर्मिंगसारख्या  समस्या निर्माण होत आहेत. मात्र झालेला विस्तार आता पुन्हा गुंडाळ्याचा कसा आणि तसे केले नाही तर परिस्थिती पूर्वपदावर येणार कशी हा प्रश्‍न समस्त मानव जातीला भेडसावतो आहे.

याच समस्येत या वन्यप्राण्यांच्या केल्या जाणार्‍या हत्या आणि होणारे मृत्यू या प्रश्‍नाचे मूळ दडलेले आहे. निसर्गाने वन्यप्राणी आणि मानव यांच्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था सुजाणपणे करून दिल्या होत्या. मात्र मानवाच्या विस्तारवादी प्रवृत्तीने  या व्यवस्थेची वाट लागली. परिणामी जंगले संपत चालली आहेत. जंगले संपत आल्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे मग दरवर्षी सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो. मात्र त्यातून फारसे काही साध्य होत  नाही.

जंगले संपत आल्यामुळे जशा पर्यावरणाच्या समस्या मानवासाठी निर्माण झाल्या तशाच वन्यप्राण्यांसाठी अस्तित्वाच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. वन्यप्राण्यांसाठी मुक्त विहार करण्याकरिता आता पुरेशी जंगले नसल्यामुळे त्यांचा वावर  नागरी वस्त्यांकडे होऊ लागला आहे. नागरी वस्त्यांमध्ये हे वन्य प्राणी येऊन प्रसंगी माणसांवर तर प्रसंगी पाळीव जनावरांवर हल्ले करतात त्याचप्रमाणे रानडुकरे, माकड, तरस, हत्ती, हरिण असे विभिन्न प्राणी नागरी वस्त्यांजवळ असलेल्या  शेतांवर हल्ले करतात. परिणामी अनेक शेतकर्‍यांचे उभे पीक नष्ट होते. पुन्हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होतो.

मग अशावेळी या वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी किंवा शहरी भागात आल्यास मनुष्य प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाय योजले जातात. शेताभोवती कुंपण घालून त्या कुंपणात विजेचा प्रवाह सोडला जातो. पिके   खराब करू नये म्हणून प्रसंगी पिकांवर विषारी द्रव्याचा फवाराही केला जातो. कधी गोफणीतून तर कधी फटाके वाजवून तर कधी छर्‍याच्या बंदुका वापरून या प्राण्यांना पळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रयत्नांमध्ये अनेकदा   वन्यप्राण्यांची हत्या होण्याचे प्रकार घडतात.

गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात एका वाघीणीने खेड्यांमध्ये शिरून सुमारे 12 ते 15 नागरीकांवर हल्ले करत त्यांची हत्या केली होती. त्यामुळे या संपूर्ण परिसरात भीतीपोटी शेतकर्‍यांनी शेती करणे थांबवून दिले होते. यासंदर्भात ओरड करूनही  कोणाचेच लक्ष गेले नव्हते. मात्र त्या वाघिणीची हत्या झाल्यावर सर्व वन्यपशूप्रेमी जागे झाले आणि महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांपासून सवार्र्ंवर खटले भरण्याची मागणी करू लागले. ज्यावेळी 13 निरपराध शेतकरी मारले गेले आणि काही वर्षी   शेकडो एकर जमीन पडीत राहिली. त्यावेळी हे वन्यजीवप्रेमी कुठे होते असा प्रश्‍न अनेकदा विचारला गेला आहे. मात्र त्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते.

नुकताच केरळमध्ये घडलेला प्रकारही असाच काहीसा असावा असे बोलले जात आहे. आपल्या देशात हत्तीची हत्या केली जाते ती त्याचे दात वापरण्यासाठी. मात्र अशा प्रकारे स्फोटके खाऊ घालून ही हत्या केली जात नाही. मिळालेल्या   माहितीनुसार, या प्रकारात स्फोटके भरून ठेवलेले अननस हे रानडुकरांसाठी ठेवले गेले होते. ही रानडुकरे शेतीचे नुकसान करतात म्हणून अशी व्यवस्था झाल्याची चर्चा कानावर आली. मात्र चुकीने हे अननस या हत्तीणीच्या तोंडी लागले  आणि पुढची दुर्घटना घडली. त्यात ही हत्तीण आणि तिच्या गर्भात असलेले बाळ या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

घडलेली घटना ही दुर्दैवीच म्हणावी लागेल. आता या घटनेच्या चौकशीची मागणी होईल. आतापर्यंत एकाला अटक झाली आहे. अजूनही काही जणांना अटक होईल. त्या परिसरात दहशत निर्माण केली जाईल. ही दहशथ काही काळ टिकेल  आणि मग पुन्हा पहिले पाढे 55 सुरु होतील.

हीच परिस्थिती कायम ठेवणे कितपत योग्य आहे? निसर्गाचा समतोल राहावा यासाठी जशी मनुष्य जमात गरजेची आहे तसेच प्राणीही हवे आहेत. आकाशातून उडणारे पक्षी आणि पाण्यात वावरणारे जलचर हे देखील तितकेच आवश्यक  आहेत. मात्र मानवाच्या विस्तारवादी धोरणाने या सर्वांच्याच अस्तित्वावर मानवाने प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. त्यातूनच या समस्या निर्माण होत आहेत. अशा समस्यांसोबत आम्ही आता कितीकाळ जगायचे याचा विचार होणे गरजेचे आहे.  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी माणसाबरोबर प्राणी, पक्षी, जलचर सर्वच हवे आहेत. त्यांच्यासाठी जंगले, जलाशय, पक्ष्यांना मुक्त विहारासाठी मोकळे आकाश हे सर्वच गरजेचे आहेत. आजच्या विस्तारवादी जगात पशूपक्षी आणि   जलचरांसाठी असलेल्या या सुविधांचा संकोच झाला आहे तो थांबवून या सर्वांनाच मानवाबरोबरच मुक्त जीवन कसे जगता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. 

हा विचार एका लेखातून होणार नाही हे निश्‍चित आहे. त्यासाठी जगभरातील पर्यावरणप्रेमी, समाजशास्त्री आणि विज्ञानप्रेमींसह जगभरातील सर्वच सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन यावर विचार करणे आज गरजेचे झाले आहे. जगाची वाढती  लोकसंख्या, या लोकसंख्येला जगण्यासाठी आजच्या काळात लागणार्‍या सोयीसुविधा आणि त्याच बरोबर मानवी जीवन सुसह्य व्हावे म्हणून सांभाळायचा निसर्गाचा समतोल या सर्वच बाबींचा साकल्याने विचार करावा लागेल. त्यातून सर्वच घटकांना सोईचे होतील असे मार्ग शोधावे लागतील. तरच या प्रश्‍नांची उत्तरे सापडू शकतील.

या प्रश्‍नांची सुयोग्य उत्तरे शोधून त्याची योग्य अंमलबजावणी होणे ही आजची खरी गरज आहे. त्यासाठी समाजहीत जपू बघणार्‍या सर्व सुजाण व्यक्तींनी एकत्र यावे हे आज आवश्यक आहे. ही सुरुवात आजच व्हायला हवी. संपूर्ण मानवजातीचे  भले व्हावे यादृष्टीने ते अतिशय गरजेचे आहे. उद्या कदाचित उशीर झालेला असेल.

तुम्हाला पटतंय का हे?

- अविनाश पाठक