गुप्तचर अधिकारी अंकित शर्माच्या हत्येमागे मोठे षडयंत्र

June 04,2020

नवी दिल्ली, 4 जून - ईशान्य दिल्लीत दंगल घडणे आणि त्यात गुप्तचर अधिकारी अंकित शर्माची निर्घृण हत्या होणे यामागे मोठे षडयंत्र होते, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. अंकित शर्माच्या शरीरावर 51 तीक्ष्ण घाव आणि इतर  अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्याची बाब शवविच्छेदनातून निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने महानगर न्यायदंडाधिकारी रिचा परिहार यांच्यासमक्ष दिल्ली दंगल प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, दिल्लीत धार्मिक दंगल उसळल्यानंतर आम आदमी पक्षाचा स्थानिक नेता ताहिर हुसैनच्या नेतृत्वाखालील जमावाने गुप्तचर अधिकारी अंकित शर्माला जीवे मारले. पूर्वनियोजितपणे कट रचून हे हत्याकांड घडविण्यात आले. हत्येनंतर अंकित शर्माचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकण्यात आला. एका दिवसानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जवळच्या एका इमारतीवरील साक्षीदाराने मोबाईलमधून एक व्हिडिओ बनविला होता. त्यात काही जण अंकित शर्माचा मृतदेह नाल्यात टाकताना दिसत असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.