नागपुरकर करताहेत सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा

June 01,2020

नागपूर.१ जून : महाराष्ट्रात आता लॉकडाउन अनलॉक होण्याची सुरुवात आजपासून झाली आहे.  अनलॉक होतांना लॉकडाउन असतांनाचे नियम पाळले नाही तर परत फिरुन लॉकडाउनचा आधार घ्यावा लागेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिला. मात्र हा इशारा धाब्यावर बसवत नागपूरकर नागरिक सोशल डिस्टंसिंगची अक्षरशः वाट लावत असल्याचे दिसून आले आहे...

सोबतच्या छायाचित्रांमध्ये शहरातील चौकात असलेल्या सिग्नललवरील परिस्थिती दिसते आहे. लाल दिवा लागताच झटक्यात वाहने थांबली खरी, मात्र सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडालेला दिसतो आहे. सध्या दुचाकीवर डबलसिट बसू नका ही सूचनाही धाब्यावर बसवली गेली आहे. विशेष म्हणजे या बेशिस्त नागरिकांना धाक बसवण्यासाठी या चौकात कोणीही पोलीस उभा नव्हता. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तुटणार की संक्रमण वाढणार याचा विचार सुजाण नागरिकांनीच करायचा आहे..

जो प्रकार सिग्नललवर चालू आहे तसाच प्रकार इतरत्रही दिसतो आहे. हळूहळू दुकाने सुरु होत आहेत. त्या दुकानांसमोर अनेक नागरिक झुंबड करतांना दिसून आले. असेच प्रकार सुरु राहिले तर नागपुरकरांचे काही खरे नाही अशी भावना व्यक्त होत आहे