महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला नारळ द्या अन राष्ट्रपती राजवट लागू करा - भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली मागणी

May 25,2020

ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही. त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली असल्याचे खुद्द राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

राणे यांनी आज राज्यपाल यांची भेट घेऊन राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली. ही भेट झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारवर टीकास्र सोडले. ते म्हणाले, राज्य कसे चालवावे, पोलिस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत, तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली. आतापर्यंत राज्याला जे काही मिळालं ते केंद्राकडूनच. राज्याने काय दिलं ? यांचं धोरण काय ? सरकारी अधिकार्यांना, पोलिसांना कसं हाताळावं, त्यांना सुरक्षित कसं ठेवावं, याचा काहीही अभ्यास नाही. सगळा अनागोंदी कारभार राज्यात सुरू असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे.

राणे यांनी ट्वीट केल्यानंतर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाली. कोरोनासारख्या संकटाच्या काळात राणेंचा हा राजकीय डाव असल्याची टीकाही होत आहे.

राज्यपालांच्या भेटीला विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने राजकीय वातावरण तापले

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यपालांच्या भेटीला विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी पवारांना निमंत्रित केले होते. ही भेट फक्त सदिच्छा भेट होती, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीही भाजप नेते, शिवसेनेचे नेते यांनीही राज्यपालांच्या भेटी घेतल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे.