परप्रांतीय मजूर पाठवण्यासाठी रेल्वेचे महाराष्ट्राला अपेक्षित सहकार्य नाही !: बाळासाहेब थोरात

May 25,2020

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आडमुठेपणा सोडून राष्ट्रीय भावनेतून सहकार्य करावे.

“आईने काळजी घेतली नाही म्हणून मावशीने काळजी घेतली”!: योगी आदित्यनाथ यांना उत्तर.

मुंबई, दि. २५ मे २०२० : 

अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या स्वराज्यात पाठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्व नियमांचे पालन करुन त्यांना रेल्वेने पाठवत आहे. परंतु या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित रेल्वे या रेल्वे मंत्रालय पुरवत नाही हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे. त्यांनी आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, राज्य सरकार एक दिवस आधीच मजुरांची यादी देते परंतु सरसकट १५७ गाड्यांसाठी मजुरांची यादी मागणे हा रेल्वे खात्याचा आडमुठेपणा आहे. दुसऱ्या दिवशी किती ट्रेन देणार त्यानुसार यादी दिली जाते. यादीत बदलही होत असतात. पण अचानक १२५ ची यादी आम्हाला लगेच द्या, एका तासात द्या असे म्हणणे म्हणजे तुम्ही मदत करायला तयार नाहीत, तुम्ही आठमुठेपणाची भूमिका घेताय हेच यातून स्पष्ट होत असून केंद्रीय मंत्र्याना हे शोभत नाही. पियुष गोयल हे मुंबईचे आहेत तरीही महाराष्ट्राला मदत करण्याची भूमिका सोडून आडमुठेपणा केला जात आहे. याकामात त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी, मदतीची भावना असली पाहिजे तसेच आपण राष्ट्रीय कार्य करतोय ही भावना असली पाहिजे परंतु दुर्दैवाने ते दिसत नाही. राज्य सरकारने यापूर्वीही जितक्या रेल्वे मागितल्या त्याच्या निम्म्या मिळत होत्या ही वस्तुस्थिती आहे आणि अचानक १२५ गाड्यांची यादी द्या म्हणायचे हे बरोबर नाही. जी सिस्टम आहे त्यात रेल्वे वाढवून द्या आम्ही यादी देतो.

उत्तर प्रदेशच्या मजुरांची महाराष्ट्रात योग्य व्यवस्था केली नाही या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आरोपालाही थोरात यांनी सडतोड उत्तर दिले. योगी आदिनाथ यांची भूमिका चुकीची असून सावत्र आई म्हणणे बरोबर नाही. आईने काळजी घेतली नाही म्हणून मावशीने काळजी घेतली. महाराष्ट्रात म्हण आहे, माय मरो पण मावशी जगो. लॉकडाऊनच्या काळात या मजुरांची दोन महिने महाराष्ट्र सरकार तसेच विविध स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी काळजी घेतली, त्यांना दोनवेळचे जेवण, औषधे मिळतील याची व्यवस्था केली, घरच्या माणसांप्रमाणे त्यांची व्यवस्था केली तसेच जातानाही त्यांना सन्मानाने पाठवले आहे असे असताना योगी आदित्यनाथ यांनी केलेले आरोप दुर्दैवी व निराधार आहेत. हे मजूर परत आल्यावर पण मावशीच काळजी घेणार आहे ते मावशीकडे परत येणार आहेत. मजुरांना घराची ओढ लागली होती, कुटुंबाने त्यांना बोलवले होते त्यामुळे ते गावी गेले पण कुटुंब काय असत? हे योगी आदित्यनाथ यांना कळणार नाही, असा टोलाही थोरात यांनी लगावला.

परप्रांतीय मजुरांना पुन्हा राज्यात घेताना त्यांच्या नोंदी ठेवाव्यात या राज ठाकरेंच्या मागणीवर थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटात ब-याच गोष्टी बदलणार असून परराज्यातील असले तरी हे कामगार या राष्ट्राचे नागरिक आहेत हे विसरून चालणार नाही. जेव्हा ते परत येतील त्यावेळी नियोजन करावे लागेल, त्यांच्या नोंदी ठेवण्याबाबत राज्य सरकारचा कामगार विभाग नक्की विचार करेल.