बिहार निवडणुकीत भाजप घेणार डिजिटल प्रचाराचा आधार

May 25,2020

नवी दिल्ली, 25 मे - चालू वर्षाच्या अखेरीस होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी भाजपने आत्तापासूनच जोरदार मोेर्चेबांधणी सुरू केली आहे. कोरोना संकटाच्या काळात प्रत्यक्षात सभा घेऊन प्रचार करणे शक्य  नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचे यथोचित पालन करत भाजप डिजिटल प्रचार करण्यास प्राधान्य देणार आहे. वृत्तस्तरावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार करण्याचा भाजपचा मानस आहे. भाजपच्या एका नेत्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना  सांगितले की, कोरोना महामारीमुळे प्रदीर्घकाळ सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर विराट सभा घेण्याऐवजी फेसबूक लाईव्ह, व्हॉट्सअ‍ॅप समूह आणि यू-ट्यूब लाईव्हचा प्रभावीपणे वापरकरून प्रचार  रण्यात येणार आहे. या सोबतच इतर तंत्रज्ञानाचासुद्धा प्रचारात भाजप खुबीने वापर करणार आहे. 243 विधानसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक प्रभारींची नेमणूक केली आहे. प्रत्येक बूथवर सप्तर्शी योद्धयांच्या माध्यमातून डिजिटल  प्रचारातून रणशिंग फुंकले जाणार आहे. बुुथवर प्रचारासाठी एक सात सदस्यीय समिती असणार आहे. निवडणूक प्रचारासाठी नवी व्यूहरचना आखली जात असल्याचे भाजपने स्पष्ट केले. उल्लेखनिय बाब अशी की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे.पी. नड्डा यांनी बिहार प्रदेश कमिटीच्या पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकताच संवाद साधत जवळपास 3 तास चर्चा केली आहे. दरम्यान, बिहारमध्ये सध्या जदयु-भाजप-लोजप आघाडीचे सरकार आहे. आगामी नोव्हेंबर  महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत या आघाडीची थेट लढत राजद-काँग्रेस महाआघाडीशी होणार आहे. बिहार निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, असे केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले  आहे.