मराठवाड्यात काल सात खून नागरिक दहशतीत

May 25,2020

औरंगाबाद, 25 मे - सर्वत्र कोरोनाची दहशत असताना काल सात हत्यांनी मराठवाड्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. उनरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज यांच्यासह अन्य एकाची एका माथेफिरूने निर्घृण  हत्या केली. बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली.

उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील मठाचे मठाधिपती शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज यांची शनिवारी मध्यरात्री हत्या झाल्याने देशभरात खळबळ उडाली. यापूर्वी पालघर जिल्ह्याच्या सीमेवर दोन साधूंची झालेली हत्या देशात चर्चेचा  विषय बनला होता. आरोपी साईनाथ लिंगाडे हा याच गावचा रहिवासी असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो चरीच्या उद्देशाने मठाच्या छातावरून शिवाचार्य महाराजांच्या खोलीत घुसला. मोठ्या कापडी रुमालाने त्याने महाराजांचा  गळा आवळून खून केला. मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून कारसह पळून जाण्याच्या तयारीत असताना मठाच्या बाहेर निघताना कार गेटमध्ये अडकली. त्यामुळे छतावरील झोपलेले लोक जागे झाले. लोकांनी मठामध्ये महाराजांचा शोध  घेतला तोपर्यंत आरोपीने पळ काढला होता.

बीड शहरात माथेफिरून पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पती संतोष कोकणे याने अनैतिक संबंधाच्या संशयातून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. लातूर जिल्ह्यात उत्तरप्रदेशातून आलेल्या  शेतमजुराने शेतमालकावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. उत्तरप्रदेशातून आलेल्या शेतमजूरास शेतमालकाने शेतावर जाऊन राहा असा सल्ला दिल्याने संताप्त शेतमजुराने साथीदारांसह हल्ला चढवला  होता.