काँग्रेसने महाराष्ट्रातील सरकारचे पालकत्व नाकारले काय?

May 25,2020

मुंबई, 25 मे - राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्ष असले तरी काँग्रेसच्या नेत्यांकडून मात्र सातत्याने या सरकारच्या विरोधात भूमिका घेतली जात असल्याचे पाहायला  मिळत आहे. आता तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना, राज्यातील सरकार हे आपले नसून ते शिवसेनेचे सरकार असल्याचेच वक्तव्य केल्याचे पुढे आले असून गत दोन दिवसांपासून या वक्तव्याने  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य बघता काँग्रेसने या सरकारचे पालकत्व नाकारले की काय असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांनी मिळून एकत्रित सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला चांगली खाती आल्याने काँग्रेसमध्ये काहीशी धुसफूस असल्याचे दिसून येते. यातूनच काँग्रेसच्या काही नेत्यांकडून अधून-मधून सरकारच्या विरोधात वादग्रस्त विधाने करताना ऐकायला मिळाले. गेल्याच आठवड्यात विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणूकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एकाऐवजी दोन उमेदवार दिल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेऊन संभाव्य वादावर पडदा टाकला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडूनही अधून मधून शिवसेनेला झटका देणारी विधाने  होत असतात.

मात्र आता तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेनेचे सरकार असल्याची भावनाच काँग्रेसमध्ये निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या संभाषणाची ध्वनिफित सध्या जोरदार व्हायरल झाली असून, त्यात ते एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलताना ऐकायला मिळत आहेत.