मंत्री अशोक चव्हाणांनाही कोरोनाची लागण

May 25,2020

मुंबई, 25 मे - राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. मुंबईतील त्यांच्या  कार्यालयाने त्याला दुजोरा दिला.

चव्हाण हे गेल्याच आठवड्यात मुंबईहून नांदेडला गेले होते. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली असता अहवालात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पुढील उपचारासाठी चव्हाण यांना आज मुंबईत हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य मंत्रीमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अधिकृत गोटातून अद्याप दुजोरा मिळालेला  नाही. सुरुवातीच्या दिवसातच राज्य मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांची सुटी होऊन ते आता परत कार्यरत झालेले आहे.