लॉकडाऊनच्या विरोधात नागपुरात नागरिक रस्त्यावर

May 24,2020

नागपूर, 24 मे - नागपूरच्या रामनगरमधील नागरिकांनी कन्टेन्टमेंट झोनला सातत्याने विरोध दर्शविला आहे. कोरोना रुग्ण नसताना या परिसरात प्रतिबधित क्षेत्र कायम कसे, असा सवाल करीत नागरिक रस्त्यावर उतरले. लॉकडाऊनच्या  नियमांचे उल्लंघन करीत नागरिकांंनी प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात रामनगरमधील नागरिकांनी कन्टेन्टमेंट झोनमधून बाहेर जाण्याकरिता कराव्या  लागणार्‍या नाव नोंदणीला विरोध केला होता. कन्टेन्टमेंट झोनमधून बाहेर जाताना रामनगर चौकाजवळ नोंदणी करावी लागत होती. उन्हाल्याचे उन्ह तापत असताना नाव नोंदणीकरिता रांगेत उभे राहावे लागत होते. नाव नोंदणीला विरोध  नसून नोंदणीच्या संतगतीवर रोष असल्याची भूमिका जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी घेतली होती. तर या भागाचे आमदार विकास ठाकरे यांनी जनक्षोमाचे नेतृत्व केले.

पांढराबोडी येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला मूत्रपिंडाचा आजार होता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर पांढराबोडी सुदामपुरीचा भाग सील करण्यात आला. प्रत्यक्षात त्या रुग्णानंतर दुसरा कोणताही कोरोना पॉझिटिव्ह  आढळून आलेला नाही. तरीही हा परिसर कन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करून सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. या संदर्भात आ. विकास ठाकरे म्हणाले की, या परिसरात एकही कोरोनाग्रस्त  रुग्ण नसताना मनपा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. मरण पावलेला रुग्ण किडनी विकाराने आजारी होता.